शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, नेमकं काय झालं याची माहिती घेतली जात आहे. मागील अडीच वर्षांपासून सरकार चालत असल्याने हे षडयंत्र रचले गेले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याआधीदेखील असं झालं होतं. त्यावेळी काही आमदारांना हरयाणात ठेवण्यात आलं होतं, असेही पवार यांनी म्हटले.
शरद पवार यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणून एकत्र आहोत. शिवसेनेच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून ठोस निर्णय, रणनीति आखू असेही त्यांनी म्हटले.
विधान परिषद निवडणूक निकालावर नाराज नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले. विधान परिषदेसारख्या निवडणुकीत अनेकदा क्रॉस मतदान होते. मात्र, त्यातून सरकारला फारसा धोका निर्माण होत नाही. अशा निवडणुकांमध्ये विपरित निकाल लागला तरी अनेक वर्ष सरकार राहिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडाळीवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चर्चा केली. त्याशिवाय, अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली.