कंत्राटी भरतीच्या निर्णयाच्या मुद्द्यावरुन राज्यातलं वातावरण तापलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कंत्राटी भरतीच्या निर्णयाचं खापर ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर फोडलं.
राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांनी माफी मागावी. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी नाक घासून जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. या मागणीचा शरद पवार यांनी शेलक्या भाषेत समाचार घेतला आहे.
पत्राकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, हे जे गृहस्थ आहेत, ज्यांचं तुम्ही नाव घेतलं ते आता त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. मात्र मागच्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीवेळी पक्षाने त्यांना तिकीटही नाकारलं होतं. ज्यांना पक्षाने तिकीट देण्यासही लायक समजलं नाही, त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं, असा टोला शरद पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे.