उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं कसं ठरलं हा घटनाक्रम शरद पवारांनी लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमात उलगडला आहे. तसंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
“महाविकास आघाडीचं सगळं काही ठरल्यानंतर मुख्यमंत्री कुणाला करायचं याबाबत बैठक झाली. आमच्याकडे त्यासंदर्भात एकनाथ शिंदेंचं नाव आलेलं नव्हतं. शिवसेनेत तशी चर्चा झाली असावी पण आमच्यापर्यंत त्याचं नाव आलं नव्हतं. तसंच एकनाथ शिंदेंबाबत आमची काही तक्रार नव्हती. आत्ताही आमच्याशी त्यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. मात्र तेव्हा तेवढी जवळीक नव्हती. विधीमंडळ पक्षांची बैठक बोलवण्यात आली तेव्हा राज्याचं नेतृत्व कुणाला द्यायचं याचा प्रस्ताव मांडण्यात आला. माझ्या शेजारी उद्धव ठाकरे बसले होते मी त्यांचा हात हातात घेतला आणि तो उंचवाला आणि त्यांच्या नावाचा विचार व्हावा हे सांगितलं. सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या आणि प्रतिसाद दिला. तेव्हा कुणीही एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं नाही.” ही पडद्यामागची घडामोड शरद पवारांनी सांगितली.
“उद्धव ठाकरेंना मी निवडलं याचं कारण, बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे शिवसैनिकांनी मान्य केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्यासाठी सगळ्यांनी तयार व्हावं हे मी सुचवलं. विशेष गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे स्वतः या पदासाठी आग्रही नव्हते. शिवसेनेच्या अंतर्गत एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा झाली होती ही गोष्ट मला नंतर समजली.” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? तसंच का निवडले गेले? हे शरद पवारांनी सांगितलं आहे आणि भाजपा तसेच एकनाथ शिंदेंच्या आरोपांना एकप्रकारे उत्तरच दिलं आहे.