गेल्या काही वर्षांत लिंगबदल केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बदललेल्या लिंगानुसार कायदेशीर दस्तावेजही तयार करून स्वतःची अधिकृत नवी ओळख तयार केली जाते. आता असाच प्रकार भारतीय नागरी सेवेतही झाला आहे. एका महिला अधिकाऱ्याने आपलं लिंग आणि नाव बदललं असून या बदलास अर्थ मंत्रालयाने परवानही दिली आहे. हा अधिकारी भारतीय महसूल विभागातील आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
वरिष्ठ भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यारी असलेल्या एम. अनुसूया (३५) यांनी आपल्या नावात आणि लिंगात बदल केला आहे. या बदलासाठी त्यांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला परवानगी देण्यात आली. भारतीय नागरी सेवेत असं पहिल्यांदाच घडलं आहे.हैदराबादमधील सीमा शुल्क आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (CESTAT) च्या मुख्य आयुक्त (अधिकृत प्रतिनिधी) यांच्या कार्यालयात एम. अनुसूया (३५) या कार्यरत आहेत. त्यांना त्यांचं नाव एम. अनुकथिर सूर्या असं बदलायचं होतं. तसंच, सरकार दफ्तरी असलेलं स्त्री लिंग बदलून पुरुष करायचं होतं. त्यांच्या विनंतीला सरकारने परवानगी दिली.
\“एम अनुसूया यांच्या विनंतीवर विचार करण्यात आला आहे. यापुढे सर्व अधिकृत नोंदींमध्ये अधिकारी एम अनुकथिर सूर्या म्हणून ओळखले जातील”, असं कागदपत्रात म्हटलं आहे. त्यांच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, सूर्या यांनी डिसेंबर २०१३ मध्ये चेन्नईमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द सुरू केली आणि २०१८ मध्ये त्यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली. गेल्या वर्षी ते हैदराबादमध्ये त्यांच्या सध्याच्या पोस्टिंगवर रुजू झाले.
एम अनुकथिर सूर्या यांनी चेन्नईच्या मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बॅचलर पदवी घेतली आहे. २०२३ मध्ये भोपाळमधील नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीमधून सायबर लॉ आणि सायबर फॉरेन्सिक्समध्ये पीजी डिप्लोमाही त्यांनी पूर्ण केला आहे.