अहमदनगर-श्रावण महिना सुरु असल्याने विविध ठिकाणी सप्ताहाचे कार्यक्रम सुरु आहेत. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातून एक बातमी आली असून भर काल्याच्या कीर्तनातच मृदंगाचार्यास त्याच्या पत्नीसह सासू-सासऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली.
ही घटना शेवगाव तालुक्यातील कोनोशी येथे हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तन सुरू असताना घडली. मच्छिंद्र नामदेव बडे असे या मारहाण झालेल्या मृदंगाचार्याचे नाव आहे. बडे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या पत्नीसह सासू, सासरे व मेहुण्याविरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समजलेल्या माहितीनुसार कोनोशी येथील सप्ताहात काल्याच्या कीर्तनात मच्छिंद्र नामदेव बडे (वय ३८, रा. कोनोशी) हे शनिवारी (१७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता मृदंग वाजवत होते. त्यावेळी त्यांची पत्नी सीमा मच्छिंद्र बडे (रा. वडगाव कोल्हाटी, वाळुंज एमआयडीसी), सासरे शिवाजी दगडू खाडे,सासू रामकवर शिवाजी खाडे व मेव्हणा अण्णासाहेब शिवाजी खाडे (सर्व रा. कोनोशी, ता. शेवगाव) कीर्तनाच्या ठिकाणी आले. पत्नी सीमाने त्यांना रेशनकार्ड देण्याची मागणी केली.त्यावर बडे यांनी ‘रेशनकार्डची झेरॉक्स देतो’ असे सांगितले. मात्र, ‘मला झेरॉक्स नको, ओरिजनल पाहिजे’ असे म्हणत सर्वांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करून पत्नी व मेहुणे अण्णासाहेब खाडे याने डोक्यात लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले.
नागरिकांनी हे भांडण सोडवले. शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यावर बडे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अद्याप एकाही आरोपीस अटक झालेली नाही. पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे.