विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तशी इच्छुक उमेदवारांची संख्या देखील वाढत आहे. नगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या खंद्या समर्थक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे.
हर्षदा काकडे यांच्या भूमिकेने भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकेकाळी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हर्षदा काकडे यांना 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, मात्र आता मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी करायची किंवा अपक्ष निवडणूक लढवायची असा निश्चय त्यांनी केला आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात सध्या भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे निवडणुकीची तयारी करत आहेत.
याबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले देखील मतदार संघामध्ये चाचपणी करत आहेत. त्यातच हर्षदा काकडे यांनी देखील मतदार संघामध्ये चाचपणी केली असून कुठल्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमके किती उमेदवार उभे राहतील आणि कोण कोणाला पाठिंबा देईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.