नगर (सचिन कलमदाणे): नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काकडे कुटुंब अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. त्यांचं नेतृत्व माननारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. परंतु दरवेळी काही कारणांनी काकडे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. शेवगाव पाथर्डी मतदारसंघांतील राजकारण कायम घुले – राजळे – ढाकणे घराण्याभोवती फिरत असते. या प्रस्थापित मातब्बराच्या मांदियाळीत शेवगाव तालुक्यातील काकडे कुटुंबिय पक्षीय राजकारणा पलिकडे जाऊन कायम संघर्ष करीत आहेत. स्व.आबासाहेब काकडे यांचा समाजकारणाचा वारसा ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे पुढे चालवत आहेत. ताजनापूर लिफ्ट पाणी योजनेसाठी काकडे यांनी कायम संघर्ष केला आहे. शैक्षणिक संस्थाचे मोठे जाळे त्यांनी निर्माण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
हर्षदाताई काकडे अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांनी संपूर्ण तालुक्यात विकासकामे केली आहेत. तालुक्यातील राजकारणात त्यांनी नेहमीच प्रभाव राखला असून यंदा विधानसभा निवडणुकीत त्या प्रमुख दावेदार असणारं आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींपासून काकडे अंतर ठेवून असल्या तरी जनशक्ती विकास आघाडीची ताकद त्यांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षदा काकडे यांनी उमेदवारी केल्यास त्या जाएंट किलर ठरू शकतात अशी चर्चा रंगली आहे.