नगर (सचिन कलमदाणे): : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नगर जिल्ह्यातही विद्यमान आमदार तसेच इच्छुकांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात शेवगाव पाथर्डी मतदारसंघात यंदा चुरशीची लढत अपेक्षित आहे. गेल्या दोन टर्म भाजपच्या मोनिका राजळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. महायुतीच्या जागा वाटपात शेवगाव पाथर्डीची जागा भाजपकडेच राहील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे आ. राजळे हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. मात्र त्यांच्या समोर आता पक्षातूनच आव्हान उभे राहिले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी जाहीरपणे आ. राजळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत २४ ऑगस्ट रोजी शेवगाव येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ते विधानसभेच्या उमेदवारीवर दावा करणार आहेत. याशिवाय गोकुळ दौंड यांनीही विधानसभा लढवण्याची तयारी चालविली आहे.
शेवगाव पाथर्डी मतदारसंघात आ.मोनिका राजळे यांनी भाजपच्या चिन्हावर सलग दोन निवडणुकीत विजय मिळवला. २०१४ मध्ये त्यांनी तत्कालीन आमदार चंद्रशेखर घुले यांचा आणि २०१९ च्या निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापकाका ढाकणे यांचा पराभव केला. या दोन्ही निवडणुकीत त्यांना या मतदारसंघात मोठे समर्थन असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांची मोठी मदत झाली. आता राजळे यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध सुरू झाल्याने शेवगाव पाथर्डी मतदारसंघात राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपकडून इच्छुक असलेल्यांची भिस्त आ.पंकजा मुंडे यांच्यावर आहे. त्यांचे वजन कोणाच्या पारड्यात पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.