शेवगाव : संदीप देहाडराय-तालुक्याची सुरक्षा बेभरोसे झाली आहे. बसस्थानकासह ग्रामीण भागात वाढत असलेले चोऱ्यांचे सत्र हे पोलिसांचे अपयश असून, नव्याने रुजु झालेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या काळात वेगळा बदल होण्याची शक्यता मावळली जात आहे. उलट नको तेथे पोलिसांचे जास्त लक्ष केंद्रीत होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
शेवगाव तालुक्याचा पोलिस विभाग सतत वादग्रस्त ठरत गेला. मध्यतंरी काही वर्ष सुरळीत गेल्यानंतर पुन्हा पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना या ना त्या प्रयत्नातुन वादग्रस्त
ठरवले गेले आणी शांततेवर पाणी फिरले. आता नव्याने रुजु झालेल्या पोलिस निरीक्षक यांच्या कालावधीत काही बदल होतो कि काय याकडे लक्ष लागले असतानाच शहरातील बसस्थानकात प्रवाशांवर मारले जाणारे चोरांचे हल्ले पाहता असुरक्षिततेचा इशारा दिला जात आहे. त्यातच दाखल ऑट्रासिटी सारखे गुन्हे आणी चापडगाव भागात वाल्हेकर वस्तीवर गुरुवारी रात्री बलात्काराची धमकी देऊन झालेली चोरीची घटना. यामुळे तालुक्याची सुरक्षितता धोक्यात
येऊ पाहात आहे. हा तालुका शांततामय आहे परंतु लगतच्या भागातील गुन्हेगार शेवगाव तालुक्यास लक्ष करतात. जुगार, वेश्या व्यवसायाच्या माध्यमातून माहिती व टेहाळणी करीत चोऱ्या, लुटालूट असे प्रकार वाढीस लागले असून, पोलिसांचा वचक खालावत चालला आहे. शहरात झालेल्या दंगलीनंतर आता कुठेशी शांतता प्रस्थापीत झाली तोच चोऱ्याच्या घटनेने पुन्हा सर्वांची झोप उडवली आहे. या पोलिस ठाण्यात काही खाजगी दलाल शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात. सत्य असत्य याची शहानिशा न करता पोलिस अधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन त्यांचे कान भरण्याचा प्रयत्न होतो आणि एखाद्या वेळेस त्यातुनच अन्यायाचा प्रत्यय येतो. यामुळे पोलिसांवर असणाऱ्या विश्वासाला तडा जातो. अधिकाऱ्यांनी असे दलाल वेळेतच दाबले तर पोलिसांना त्यांच्या पद्धतीने काम करणे सोईस्कर होते. मात्र नविन पोलिस निरीक्षक यांच्या कामाची कार्यपध्दत अद्याप उमजली नसली तरी वेगवेगळ्या घटनेच्या माध्यमातुन गुन्हेगार सध्या आव्हान देत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ पाहात असुन सध्यातरी सुरक्षितेत बदल होईल ही अपेक्षा मावळली जात आहे.
ग्रामीण भागात वाढत असलेले चोऱ्यांचे सत्र, शेवगाव तालुक्याची सुरक्षा ‘रामभरोसे’
- Advertisement -