विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेंकांना धक्काबुक्की केली. विधीमंडळाच्या लॉबीमध्येच हा राडा झाला. यानंतर शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार त्यांच्यासोबत होते. त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले, त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्येही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र ज्या पद्धतीचा वाद या एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याचं समोर आलेलं आहे, यावरुन राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं, हे खरंतर महायुची सरकारमधली अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे. या घटनेच्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं, तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळे वाद, या सर्व आमदारांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत, त्यावरुन पक्षांतर्गत कलह तर नाही ना, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. मात्र ही जी वादावादी आहे, ती लॉबीमध्ये पार पडली आणि त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी करत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना थांबण्याचा प्रयत्न केला.