राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यात अजित पवार गट आक्रमक झाला आहे. आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर महाआरती करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आव्हाड यांच्या विरोधात येत्या 24 तासात गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास वर्तक नगर पोलीस ठाण्यात महाआरती करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.
राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात उपस्थित केला. तसेच शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा या विषयावर बोलते केले. तेव्हा ते म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असेही आव्हाड म्हणाले.