महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित होण्याआधीच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही नाराजी व्यक्त करून फेरविचाराची मागणी केली. असाच विरोध शिर्डी मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला होत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी वाकचौरेंना उमेदवारी जाहीर होताच मातोश्री गाठून नाराजी व्यक्त केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत वाकचौरे यांना शिर्डीतून विरोध असल्याचे त्यांनी ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर ठाकरे यांनी शिष्टमंडळाची समजूत काढून ‘आपला निर्णय झाला आहे, आता फैसला साईबाबांवर सोपवू,’ अशा शब्दांत विषय संपविल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवरुन काँग्रेसचे चिन्ह व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बॅनर हटवले आहे. ‘एकच ध्यास, शिर्डी लोकसभेचा विकास’ अशी घोषणा त्यांनी सोशल मीडियातून दिली आहे. शिर्डीची जागा काँग्रेसला मिळाल्यास रुपवते निवडणूक लढविण्याच्या तयारीत होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी महिनाभराचा कालवधी आहे. त्यामुळे या काळात आणखी काही घडामोडींची शक्यता आहे.
https://x.com/bb_thorat/status/1772888222760317255?s=20