शिर्डी : शरद पवारांनी मराठा समाजाचे आजवर वाटोळे केले. त्यांनी सुचवलेला पन्नास टक्क्यांवरील आरक्षणाच्या मार्गाशी आमचा संबंध नाही. तो त्यांनीच कसा देता येईल याबद्दल स्पष्ट करावे, अशा शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मंगळवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. पवारांना आजवर जमले नाही म्हणून तर आम्ही तुमच्याकडे मागत आहोत, असे सांगत त्यांनी महायुतीला विचारणा केली आहे.
जरांगे म्हणाले, की मराठा आरक्षणाचा हा प्रश्न अगोदरच्या सरकारांनी देखील भिजत ठेवला. महाविकास आघाडीतील पक्षांनी याबाबत काहीही केले नाही. विशेषत: पवारांनी देखील या प्रश्नावर काही न करता समाजाचे वाटोळे केले. परंतु हे पक्ष असे वागले म्हणून तर मराठा समाज महायुतीकडे आरक्षण मागतो आहे. पण तुम्हीही तसेच वागत आहात. साधे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असे म्हटले होते. पण आज ११ महिने झाले. तरी संपूर्ण गुन्हे मागे घेतलेले नाहीत.