शिर्डी : अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील दादागिरी आम्ही शरद पवार यांच्यामुळेच सहन केली. आता त्यांना परतीच्या वाटा बंद करून टाका. २०१९ मध्ये परत आल्यावर, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करणे ही मोठी चूक होती, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.
निवडणुका आल्या की रामाचे नाव घेऊन महाराष्ट्र अस्वस्थ केला जातो. जातीय तणाव निर्माण केला जातो. देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न होत आहे. उन्माद वाढवला जात आहे. त्यामुळे लोकशाही टिकेल की नाही असा प्रश्न पडतो. आताही रामाचे नाव घेऊन निमंत्रण देणारे तुम्ही कोण आहात, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. दरम्यान राम शाकाहारी नसून मांसाहारी असल्याचे विधानही या वेळी आव्हाड यांनी केले.
मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही, तरीही ते शब्द कसा देतात? ओबीसींना कायद्याने संरक्षण दिलेले आहे. मग अशा परिस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांना बोलायला कोण भाग पाडत आहे, त्यांना बोलायला भाग पाडून गावोगाव आग लावली जात आहे. त्या पाठीमागे सरकारचे राजकारण आहे. त्या राजकारणाचे भुजबळ बळी ठरले आहेत, असाही आरोप आव्हाड यांनी केला.