शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी भाऊसाहेब वाकचौरेंविरोधात बंड पुकारले आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा देखील त्यांनी समाचार घेतला. याबाबत अशोक गायकवाड यांनी श्रीरामपूर येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. अॅड. मिलिंद गायकवाड, रवींद्र साठे, भीमजी साठे उपस्थित होते.
अशोक गायकवाड म्हणाले, “शिर्डीच्या साईबाबा, उध्दव ठाकरे आणि जनतेला फसविणारे पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे दावेदार, हे दुर्देव आहे. आपण शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून योग्य असल्याचे वरिष्ठांना पटवून दिले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास आपण बंड करणार असून अशा प्रवृत्ती गाडल्या गेल्या पाहिजे”, असा थेट हल्ला माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव घेत अशोक गायकवाड यांनी चढवला.
गायकवाड म्हणाले, “मी बंड पुकारून त्यांच्याविरुध्द शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवणे पसंद करेल. मी एक शेतकरी असून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी नेहमीच तत्पर असतो. उमेदवारीसाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. माझा व्यक्तीला विरोध नसून प्रवृत्तीला आहे. त्यांचे काम मी करणार नाही”. उध्दव ठाकरे यांनी कोकणसह अन्य ठिकाणचे उमदेवार जाहीर केले. मात्र शिर्डीच्या उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे येथील उमेदवारी वाकचौरे यांनाच मिळेल, असे नाही. वाकचौरे यांच्या व्यतिरिक्त कोणाला उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करू, असेही गायकवाड स्पष्ट केले.