Thursday, November 14, 2024

प्रवरेची वाघीण विधानसभेत गरजणार..लोणी खुर्द येथील सभेतून आ. थोरात व खा. लंके यांचा हल्लाबोल

धांदरफळ येथील घटनेला तुम्हीच जबाबदार आहात

दहशत कुठे आहे एकदा तुलना होऊन जाऊ द्या
आमदार बाळासाहेब थोरात

प्रवरेची वाघीण विधानसभेत गरजणार — खा. निलेश लंके

प्रवरा परिसरातील दहशत कायमस्वरूपी गाडा- खा. निलेश लंके

लोणी खुर्द येथील सभेतून आ. थोरात व खा. लंके यांचा हल्लाबोल

राहता (प्रतिनिधी)–धांदरफळ खुर्द येथील डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यावर झालेली टीका ही एकटीवर नसून तमाम माता भगिनींवर आहे. ज्यांनी टीका केली ते विखे यांचा पट्टा बांधून फिरत आहेत. ते बोलताना तुम्ही टाळ्या वाजवत होता. नेत्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे समोरील लोक टाळ्या वाजवतात या घटनेला तुम्हीच जबाबदार असून दहशत खरी राहता तालुक्यात आहे .एक वेळ विकासाबाबत आणि दहशतीबाबत तुलना होऊन जाऊ द्या असे खुले आवाहन काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून राहता परिसरातील दहशत कायमस्वरूपी गाडा असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले आहे.

लोणी खुर्द येथील लोमेश्वर मंदिर परिसरात सौ प्रभावती ताई घोगरे यांचा अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. निलेश लंके, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ प्रभावती ताई घोगरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ॲड.नारायण कारले, सरपंच जनार्दन घोगरे ,राजेंद्र घोगरे , विजय दंडवते ,शीतल लहारे ,सचिन चौगुले ,सुधीर म्हस्के ,सिमोन जगताप, गणपतराव सांगळे, उत्तम आहेर ,सौ लताताई डांगे, राजेंद्र घोगरे, डॉ एकनाथ गोंदकर, राजेंद्र निर्मळ चंद्रभान धनवटे, शिवसेनेचे सुहास वहाडणे आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सध्या राज्याचे लक्ष हे संगमनेर आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे. सर्वसामान्य जनतेच्या आनंद निर्माण करण्यासाठी ही लढाई आहे .धांदरफळ येथील सभेमध्ये वसंत देशमुख वाईट बोलला. तो विखे यांचा पट्टा घालून फिरत असतो. त्याने डॉ.जयश्रीताई थोरात यांचा अपमान केला तेव्हा विखे हे टाळ्या वाजवत होते म्हणून या घटनेला तुम्ही जबाबदार आहात.

तुम्ही वसंत देशमुख ला म्हणतात आमचे नेते, तुम्हाला वेळ कमी पडला पुढे वेळ वाढून देतो, ही कोणती प्रवृत्ती आहे .महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या तुमच्या प्रवृत्तीला आमच्या महीलांनी जाब विचारला तर तुम्ही पळून गेला .त्यावेळेस तुम्ही कार्यकर्त्यांना विसरले. तुम्ही मर्द होता तर का लपून पळाले आणि त्या सभेमध्ये स्थानिक कुणीही नव्हते सगळे राहता मतदार संघातील मंडळी होती.

अत्यंत खालच्या पातळीवर टीका झाली .पण जयाताई रडली नाही. संगमनेर तालुका चळवळीचा आहे. रागावत नाही आणि रागावला तर काय होते हे तुम्ही पाहिले आहे. संगमनेरच्या नादाला लागू नका. अंभोरे येथील सभेत नाटकी भाषणे सर्वांनी पाहिली आहेत. दहशतीचे आरोप आमच्यावर करतात खरी दहशत कुठे आहे एकदा जनतेच्या न्यायालयात समोरासमोर होऊन जाऊ द्या असे आव्हान देताना तुम्ही विरोधी बोलले म्हणून अनेकांची हातपाय मोडले .अगदी फ्लेक्स सुद्धा लावू दिले जात नाही इतकी तुमची दहशत आहे.

संगमनेर तालुका विस्ताराने मोठा आहे परंतु तेथील साखर कारखाना, दूध संघ, गाव पातळीवरील संस्था या सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही चालवतो .वेगवेगळ्या समाजाला संधी दिल्या. मानाची पदे दिली. अगदी तुम्हाला दोन वेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिले. तुम्ही कृतघ्न निघालात. जिकडे सत्ता तिकडे तुम्ही जाता सत्तेसाठी काही पण अशी तुमची वृत्ती आहे

महसूल मंत्री असताना शेती महामंडळाच्या जमिनी मी वाटल्या .निळवंडे धरण पूर्ण करून पाणी मी आणले तुम्ही फक्त पाणी सोडले अगदी ज्यांनी या कामात मदत केली त्या ज्येष्ठ नेते पिचड साहेबांना तुम्ही धरणावर सुद्धा नेले नाही अरे हा किती कृतघ्नपणा आहे.

संगमनेर तालुक्यातील विरोधक सुद्धा आमचा आदर करतात आम्ही त्यांना सन्मान आणि वागवतो. गणेश कारखाना आम्ही चांगला चालवला तीन हजार रुपये भाव दिला तुम्ही प्रवारानगर कारखान्यात मागील दहा वर्ष काय भाव दिला ते जनतेला सांगा असे सांगताना मी डॉ. जयश्रीताई चा बाप आहे तसा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे हे विसरू नका असा इशारा त्यांनी दिला

तर खा.निलेश लंके म्हणाले की, संपूर्ण राज्यामध्ये सुसंस्कृत नेता म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांना ओळखले जात आहे. प्रवरा परिसरात त्यांची मोठी दहशत आहे. ही दहशत कायमची काढण्यासाठी सर्वांनी प्रभावती ताई घोगरे यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांची यंत्रणा ही फुटीर आहे. या प्रवृत्तींचे विचार घाणेरडे आहेत. हे कसले टायगर. मांजरीने वाघाचे कातडे पांगरले म्हणून टायगर कोणी होत नाही. 23 नोव्हेंबर नंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे तेव्हा प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नका. दडपशाही करू नका अन्यथा उलटी गिनती आम्ही करू शकतो. खासदार शरदचंद्र पवार व आमदार बाळासाहेब थोरात यांचे संस्कार आमच्यावर आहेत म्हणून विनंती करतो की वाईट वागू नका

तर सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या की, या परिसरातील हुकूमशाही संपवण्यासाठी मी गृहिणी उभी आहे .हे लोक संगमनेर मध्ये जाऊन ओरडून भाषणे करतात .पण इथे किती दहशत आहे .ती या सामान्य जनतेला विचारा . सरकार लाडक्या बहिणी म्हणते. मात्र या बहिणीची सुरक्षितता सरकार करत नाही .या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सर्वांनी आशीर्वाद द्या शेतकऱ्याची लेक, भिडणार थेट असे म्हणून त्यांनी विखे यांना आव्हान दिले.

तर खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की शिर्डी मतदारसंघांमध्ये यावेळी परिवर्तन नक्की होणार आहे. तर मा आमदार डॉ.तांबे म्हणाले की, राज्यातील तमाम महिला भगिनींनी महाविकास आघाडीला साथ देत महिला व बालिका यांना असुरक्षित करणाऱ्या महायुतीला पराभूत करावी असे आवाहन केले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

राहता तालुका दहशत मुक्त करून स्वतंत्र व समृद्ध करू

साठ वर्षांमध्ये मंत्री, खासदार, आमदार ही सर्व पदे असताना नगर मनमाड रस्ता करता आला नाही .निवडणुका जवळ आल्या की अगदी डांबरावर सुद्धा मुरूम टाकतात. असे सांगताना एमआयडीसी ही फक्त निवडणुकीसाठी आहे. आयटी पार्क हवेत विरला आहे. या परिवर्तनाच्या लाटेमध्ये सर्वसामान्य माणूस महाविकास आघाडी सोबत असून राहता तालुका दहशतमुक्त करून येथे सर्वांना स्वातंत्र्य व समृद्धीचे जीवन जगता येईल असे वातावरण निर्माण करावयाचे असल्याचे आमदार थोरात यांनी सांगितले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles