राहाता : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सनदी सेवेतील (आयएएस) अधिकारी व नागपूर येथील रेशीम वस्त्रोद्याोगाचे संचालक गोरक्ष गाडीलकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचा आदेश आज सोमवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढला आहे. गाडीलकर हे जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवासी आहेत.
यापूर्वी साईबाबा संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी असलेले दोन्ही अधिकारी हे नागपूर येथील रेशीम वस्त्रोद्याोगाचे संचालक पदावर कामकाज बघितलेले होते. त्यांचा कार्यकाळ थोडा वादग्रस्त ठरला त्यामुळे त्यांची अल्पकाळातच बदली करण्यात आली. आता तिसरे अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे देखील नागपूर येथील रेशीम वस्त्रोद्याोगाचे संचालक असल्याने सलग तीन अधिकारी या ठिकाणाहून नियुक्त करण्यात आले आहेत.