शिर्डी येथे विखे पिता-पुत्रांना त्यांच्या होम ग्राउंडवर विवेक कोल्हे गटाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत कोल्हे गटाने सत्तांतर घडवून आणले आहे. कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने सोसायटीच्या सर्वच्या सर्व 17 जागांवर निर्विवाद विजय मिळवला आहे.
शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शिर्डी संस्थानमधील कर्मचाऱ्यांची ही सोसायटी म्हणजे कामधेनु .सोसायटी ही निवडणूक पहिल्या दिवसापासून रंगतदार स्थिती होती. निवडणुकीसाठी तीन पॅनल होते. 17 जागांसाठी 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे गटाचा साई हनुमान पॅनल, खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या गटाचा साई जनसेवा पॅनल होता. तर या विरोधात कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनल होता.
विठ्ठल पवार यांना विखे पिता-पुत्र यांच्या गटाच्या पॅनलने तगडे आव्हान उभे केले होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. यासाठी आज 11 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पाडली असून 97% मतदान झाले आणि लगेचच मतमोजणी झाली. यात 17 शून्याच्या फरकाने कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे गटाच्या दोन्ही पॅनलचा पराभव करत सोसायटीची सत्ता खेचून आणली.