Shirdi साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची गणेशोत्सवातच दिवाळी झाली आहे. 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 2000 सालापर्यंतचे 1052 कर्मचारी 2004 साली कायम झाले होते. त्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर 598 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णयल सरकारने घेतल्यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. 598 कर्मचाऱ्यांसोबत 2023 पर्यंत सेवेत 10 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कायम सेवेत घेतले जाणार आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “साईबाबांच्या शिकवणी प्रमाणे आम्ही काम करत गेलो. साईबाबांच्या आशीर्वादाने हा ऐतिहासिक निर्णय आम्हाला करता आला. कोण टीका करतंय, कोण गैरसमज पसरवतंय यात आम्ही वेळ घातला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने चालना दिली ते उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संस्थानची समिती आणि अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.