भंडारा गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पूर्व विदर्भात काँग्रेस संघटन अधिक मजबूत होण्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. टिळक भवन येथे शिशुपाल पटले यांचा पक्षप्रवेश झाला.
पक्षप्रवेशानंतर शिशुपाल पटले म्हणाले की, आपण अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम केले पण आता तो भाजप राहिला नाही. तो आता व्यापारी आणि ठेकेदारांचा पक्ष झाला आहे. या पक्षाला शेतकरी सर्वसामान्य जनतेशी काही देणंघेणं नाही. ईडी सीबीआय यासारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडण्याचे घृणास्पद प्रकार करून सत्ता मिळवण्याचा हव्यास आम्हाला आवडलेला नाही. या देशातील आणि राज्यातील जनतेला न्याय देण्याचे आणि राज्याला पुढे घेऊन जाण्याचे काम काँग्रेस पक्षच करू शकतो, त्यामुळेच नाना पटोलेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे शिशुपाल पटले म्हणाले.