महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय. नागपूर येथे मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळालीय. तर काही आधीच्या मंत्र्यांना डच्चू मिळालाय. ज्या आमदारांची मंत्रिपदाची वर्णी लागलीय. त्यांना पक्षाकडून फोन गेले आहेत, त्यांना नागपूर येथे शपथविधीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलंय. याचदरम्यान शिंदे गट शिवसेनेला मोठा धक्का मिळाला आहे. एकनाथ शिंदेंनी मंत्रिपदाचं प्रॉमिस पाळलं नाही, त्यामुळे तीनदा आमदारकी भुषवणाऱ्या नरेंद्र भोंडेकर यांनी मोठा निर्णय घेतला.
ज्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, ते नाराज झाले असल्याची चर्चा आहे. अशात शिवसेनेच्या आमदाराने थेट राजीनामा दिल्याची बातमी भंडारा येथून आलीय. महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे, त्याचवेळी शिंदे सेनेला मोठा धक्का बसलाय. तीनदा आमदार म्हणून निवडून येणारे शिवसेनेचे नेते भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलाय.
त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळात कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी हा राजनामा दिलाय. भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज आहेत की काय अशा चर्चेला आता उधाण आले आहे.