शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांकडूनच काही माजी मंत्र्यांना विरोध करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळातकाही माजी मंत्र्यांना स्थान देऊ नका अशी चर्चा आमदारांमध्ये रंगू लागली आहे. यामध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या नेत्यांकडे गेल्यावर काम होत नसून हे नेते केवळ आश्वासने देतात प्रत्यक्षात कामे होत नसल्याचा आरोप आमदार खासगीत करत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा करण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. तर ५ नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रीपदावर दावा केला होता. मात्र भाजपने (BJP) शिंदे गटाला गृहमंत्रिपद देण्यास नकार दिला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले नगरविकास खाते देखील शिवसेनेला मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याऐवजी महसुल आणि गृहनिर्माण ही दोनच खाती मित्रपक्षांना देण्याची भाजपची तयारी आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपाचा तिढा कसा सोडविला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.