मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करणाऱ्या चेतन पाटील याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई केली आहे. आता चेतन पाटील याची कसून चौकशी केली जाणार आहे.
त्यामुळे चौकशीत आणखी काय गोष्टी समोर येतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवताना चेतन पाटील याने चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन केलं होतं. पुतळा कोसळल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर एफआरआर दाखल केला. याशिवाय पुतळा तयार करणाऱ्या जयदीप आपटे याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, चेतन पाटील याने सर्व आरोप फेटाळून लावले होते. मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करून दिलं होतं. संपूर्ण पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीनं केलं होतं, असं चेतन पाटीलने स्पष्ट केलं होतं.
पोलिसांनी गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र, सातारा पोलिसांनी आज शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आरोपी चेतन पाटील याला ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला गती दिली आहे.