कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, राज्यात कुठेही महापुरूषांचा पुतळा उभारायचा असल्यास कला संचलनालयाची परवानगी घ्यावी लागते. अन्यथा त्यांना पुतळा उभारता येत नाही. आमच्याकडे जेव्हा एखादी एजन्सी पुतळा उभारण्याची परवानगी मागते, तेव्हा त्याबरोबर त्यांना पुतळ्याचे क्ले मॉडेल सादर करावे लागते. या प्रकरणात शिल्पकाराने सहा फुटांचा क्ले मॉडेल सादर केला होता. यानंतर कला संचलनालयाची समिती ज्यामध्ये तज्ज्ञ, कला इतिहासकर आणि कलाकार यांचा समावेश असतो, ही समिती पुतळ्याच्या क्ले मॉडेलची तपासणी करून परवानगी देत असते. यात महापुरूषाच हावभाव, त्यांची शारीरिक रचना यावर बारकाईने कटाक्ष टाकला जातो. यानंतर क्ले मॉडेलला परवानगी दिली जाते. क्ले मॉडेलला परवानगी मिळताच संबंधित शिल्पकार त्याला पुढे कशाप्रकारे नेतो, ही त्याची जबाबदारी असते.
“मालवणच्या घटनेमध्ये असे झाले की, आम्ही केवळ सहा फुटांच्या क्ले मॉडेलला मान्यता दिल्यानंतर तसे नौदललाही कळविण्यात आले. मात्र त्यानंतर हा पुतळा ३५ फुटांचा केला जाणार आहे, याबाबत आम्हाला माहिती देण्यात आली नव्हती. तसेच पुतळ्याच्या स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टिलचा वापर होणार आहे, याचीही आम्हाला कल्पना नव्हती. तसेच पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुविशारदाकडून घ्यावी लागते. दोन्ही परवानगी मिळाल्यानंतर शिल्पकाराला तसे पत्र दिले जाते. त्यानंतर शिल्पकाराची जबाबदारी असते”, असेही राजीव मिश्रा यांनी सांगितले.