शिवसेना आणि दसरा यांचं अनेक दशकांपासूनचं नातं आहे. शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी इतिहासातील सगळ्यात मोठी फूट पडली. त्यानंतर शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला आणखी महत्त्व प्राप्त झालं. सरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरुन रस्सीखेच होऊ लागली. ठाकरेसेनेचा यंदाचा मेळावा शिवाजी पार्कातच होणार आहे. त्यामुळे ठाकरेंनी मैदान मारलं आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरुन आधी झालेली खेचाखेची पाहता ठाकरेंच्या शिवसेनेनं यंदा हुशारी दाखवली. मागील घटनांमधून बोध घेत त्यांनी ८ महिन्यांपूर्वीच शिवाजी पार्कसाठी अर्ज करुन ठेवला होता. त्यामुळे त्यांना शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदेसेनेनं शिवाजी पार्कसाठी अर्ज केलेलाच नव्हता. त्यामुळे ठाकरेसेनेला शिवाजी पार्क मिळवण्यात फारशी अडचण आली नाही.