एकनाथ शिंदे महायुतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. ते बैठकांना उपस्थित राहत नाहीत. या नाराजीनाट्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल आहे का? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. महायुतीत शिवसेनेची (शिंदे) नेमकी मागणी काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, आमच्या नेत्यांचा योग्य सन्मान राखावा ही आमची मागणी आहे असं शिवसेनेचे (शिंदे) नेते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
दीपक केसरकर म्हणाले, “कार्यकर्ते म्हणून आम्हा शिवसैनिकांची मागणी आहे की आमच्या नेत्याचा योग्य तो मानसन्मान राखावा. कारण खरी शिवसेना कोणाची आहे ते एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलं आहे. ही युती एकट्या शिवसेनेची नाही. युती ही भाजपा व शिवसेनेची आहे. एकनाथ शिंदे यांनी ही युती केली तेव्हा त्यावर अनेकांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थि केले. आमच्या शिवसेनेला काहीजण खोटी शिवसेना म्हणाले. परंतु, आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलं. आमची शिवसेना हीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे हे आम्ही सर्वांनी सिद्ध केलं. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांवर चालते. आमच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह देखील आमच्याकडेच आहे. आमचीच शिवसेना खरी असून निवडणुकीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी ते सिद्ध केलं आहे, हे त्यांचं फार मोठं यश आहे. त्यामुळे आमच्या नेत्याचा योग्य मान-सन्मान राखावा”.