मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. दोन दिवसांपूर्वी जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयात जोशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडूण येत त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली होती. शिवसेनेकडून जोशी यांनी मुंबईचे महापौरपदही भूषविले होते. १९९५मध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती.लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.