विधानसभा निवडणुकीतील अपयश पचवून शिवसेनेने (ठाकरे) आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी ‘हिंदुत्वा’चा नारा दिला आहे. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत होती, उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार. शिवसेना हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या (ठाकरे) बैठकीत नेते, पदाधिकारी व माजी नगरसेवकांना दिले. शिवसेना नेत्यांनी त्यानुसार कामाला सुरुवातही केली आहे. मात्र, यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा नवा मित्र नाराज झाला आहे. या हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याची देखील चर्चा आहे. तर काहीजण दावा करू लागले आहेत की मुंबई मनपा निवडणुकीआधी आघाडीत बिघाडी होऊ शकते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने त्यांचा मित्र भाजपाशी असलेली पारंपरिक युती तोडली आणि पुरोगामी विचारांच्या काँग्रेसचा हात धरला. राष्ट्रवादी काँग्रेसलाही बरोबर घेत महाविकास आघाडी बनवली व अडीच वर्षे महाराष्ट्राची सत्ता सांभाळली. शिवसेना फुटल्यामुळे त्यांचं सरकार गेलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी जपली. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षासह मविआला यश मिळालं. मात्र नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मविआ सपशेल अपयशी झाली आहे. मविआला राज्यात अवघ्या ४९ जागा जिंकता आल्या. ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ २० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. परिणामी आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने रणनिती बदलली आहे.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व माजी नगरसेवकांना स्पष्ट संदेश दिला आहे की विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधका शिवसेना (ठाकरे) हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार करण्यात आला. महापालिका निवडणुकांतही विरोधकांकडून हा अपप्रचार केला जाण्याची शक्यता असून, त्याला योग्य पद्धतीने खोडून काढा. शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडलेले नाही. हिंदुत्वासाठी लढत राहणार, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. अशातच शिवसेनेचे (ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शुक्रवारी (६ डिसेंबर) एक्सवर केलेल्या एका पोस्टमुळे महिवाआत वादाची ठिणगी पडली आहे. बाबरी मशिद विध्वंसाला काल ३२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्या घटनेचं समर्थन करणारी पोस्ट नार्वेकरांनी एक्सवर केली होती. त्यावर काँग्रेस नेते रईस शेख यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्या पोस्टचा निषेध नोंदवला आहे.
https://x.com/NarvekarMilind_/status/1864756272572027013
रईस शेख यांनी नार्वेकरांची पोस्ट रिपोस्ट करत म्हटलं आहे की “आपल्याला आठवण करून देतो की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मागील दोन निवडणुकांमध्ये – लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतदारांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. भारताच्या इतिहासातील त्या काळ्या दिवसाचे अशा प्रकारे गौरवीकरण अयोग्य आणि अनावश्यक आहे. अशा प्रकारच्या गौरवीकरणाचा मी तीव्र निषेध करतो.