निघोजमध्ये राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता आयोजन
जयंत पाटील, अमोल कोल्हेंची उपस्थिती
पारनेर : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा शुक्रवार दि.२७ सप्टेंबर रोजी निघोजमध्ये पोहचणार आहे. यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मळगंगा मंदिर देवस्थानच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या राणीताई लंके यांनी दिली.
पाच वर्षांपूर्वी खा. नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर काढण्यात आलेल्या यात्रेचेही निघोज येथेच आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये लंके यांच्या निवडणूकीसाठी अनेकांनी मदतीचे धनादेश मान्यवरांकडे सुपूर्द केले होते.
यंदा नीलेश लंके हे लोकसभेेमध्ये पोहचले असून त्यांच्या पत्नी राणीताई लंके या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार आहेत. निवडणूकीच्या अनुषंगाने राणीताई लंके यांनी तयारीही सुरू केली असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सध्या मतदारसंघात ब्रेस्ट कॅन्सर तपासणी तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन पंचायत समितीच्या गणनिहाय करण्यात आले आहे. या शिबिरांना महिला तसेच रक्तदान करणाऱ्या तरूणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी मोफत मोहटादेवी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दि. ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान ही यात्रा संपन्न होणार आहे.
शिवस्वराज्य यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी खा. नीलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य उपथित राहणार असून मतदारसंघातील नागरीकांनी सभेस मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राणीताई लंके यांनी केले आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने पारनेर मतदारसंघावर दावा करीत लंके यांनी विधानसभेला मन मोठे करावं असं म्हटलं होतं. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी तर वेळप्रसंगी बंडखोरी होईल असा इशाराही दिला आहे. एवढं होऊनही राष्ट्रवादीची यात्रा पारनेर मतदारसंघात येत असल्याने हा पक्ष मतदारसंघावरील दावा सोडणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.