अहमदनगर (प्रतिनिधी) – फेसबुक, इंस्टाग्राम वर धर्मवीर प्रॉडक्शन नावाने पेज तयार करून त्यावर मुलींना वेबसेरीज, चित्रपटात काम मिळवून देण्याचे तसेच विविध प्रकारच्या नोकऱ्या देण्याचे अमिष दाखवत त्यांच्याशी जवळीक करून नंतर त्यांना ब्लॅकमेल करत वाममार्गाला लावण्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. एका तरुणीने जागरूकता दाखवत याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारी वरून योगेश थोरात याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावेडी उपनगरात राहणार्या एका तरुणीला इंस्टाग्रामवर धर्मवीर प्रॉडक्शन नावाच्या पेज वर ७० हजार रुपयांची नोकरी अशी जाहिरात दिसली. तिने त्यावर मेसेज केला असता सदर पेज चालवणारा योगेश थोरात याने त्या तरूणीचा मोबाईल नंबर मागितला. तिने फोनवर त्याला कामाचे स्वरूप विचारले असता त्याने प्रायव्हेट डिटेक्टीव्हचे काम असल्याचे सांगत समक्ष भेटून सविस्तर कामाचे स्वरूप सांगतो असे म्हणत शुक्रवारी (दि.२७) दुपारी नगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील आकाश हॉटेल येथे भेटायला बोलून घेतले.
तेथे दोघे भेटल्यानंतर योगेशने फिर्यादीला तुला प्रायव्हेट डिटेक्टीव्हचे काम करायचे असल्याचे सांगून नवरा बायकोचे भांडण असल्यास त्यांची सविस्तर माहिती काढायची. वेळ प्रसंगी त्या व्यक्तीसोबत शरीर संबंध ही करावे लागतील. या कामाचे तुला खूप पैसे भेटतील त्यातील फक्त ८ हजार मला द्यायचे उर्वरित सर्व पैसे तुझे. असे म्हणत चल आपण आकाश हॉटेल मध्ये जावून बोलू तुला अजून सविस्तर सांगतो. माझ्या कडे नगरमधील अनेक मुली काम करत आहेत असे म्हणाला.
त्यावेळी त्या तरुणीने हॉटेल मध्ये येण्यास नकार दिला असता त्याने तिचा हात पकडून ओढत नेत तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी तिने आरडाओरडा केल्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी तिची त्याच्या तावडीतून सुटका केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादी वरून योगेश थोरात विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सखोल चौकशी करण्याची मनसेची मागणी
दरम्यान सदर प्रकार त्या तरुणीने मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांना फोनवर सांगितला. ही माहिती मिळताच सुमित वर्मा सह पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून योगेश थोरात याला व त्या तरुणीला मनसेच्या दिल्लीगेट येथील कार्यालयात आणले. त्याच्या कडे याबाबत विचारपूस केली. त्याचा मोबाईल तपासाला त्यावेळी त्यात त्याने अनेक अल्पवयीन मुलींचे अश्लील फोटो, मुलींसोबत केलेले अश्लील चॅटिंग व फोन वर केलेल्या संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग आढळून आले.
मनसे पदाधिकाऱ्यांनी हा सर्व प्रकार फेसबुक लाईव्ह करत ज्या मुलींची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. त्यानंतर सदर आरोपी यास तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देत त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार
दरम्यान या प्रकरणातील आरोपीने शनिवारी (दि.२८) रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात सुमित वर्मा (रा. माणिक मोतीनगर, सक्कर चौक, नगर), अमोल ऊर्फ अंबरनाथ भालसिंग (रा. हनुमाननगर, अरणगाव रस्ता, नगर), अनिकेत भाऊ सियाळ (रा. शिवाजीनगर, नगर), प्रकाश गायकवाड (रा. नगर) व इतर तीन ते चार अनोळखी इसमांनी मनसेच्या दिल्लीगेट येथील कार्यालयात आपणास लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी सुमित वर्मा यांच्यासह ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.