आपण शॉवर एकदा का फिट केला की तो स्वच्छ करायला अनेकदा विसरतो, डाग पडले तरी त्याला फार फार तर पुसून घेतलं जातं. अशावेळी जेव्हा शॉवरच्या पाईपमध्ये माती किंवा घाण साचत जाते, काही वेळा गंज लागतो आणि तेच पाणी आपण आंघोळीसाठी वापरतो, याचा परिणाम मग त्वचेच्या समस्यांमधून दिसून येतो. हे सर्व टाळण्यासाठी आज आपण अगदी स्वस्त व मस्त असा शॉवर स्वच्छ करण्याचा जुगाड पाहणार आहोत.
काही शॉवर्सचे नोजल म्हणजेच पुढील भाग ज्यातून पाण्याचा फवारा येतो तो भाग रबरसारखा लवचिक असतो. अशाप्रकारचे नोजल हे टूथब्रशने घासून स्वच्छ करता येतात.
काही नोजल हे डब्याच्या झाकणाप्रमाणे उघडून वेगळे सुद्धा करता येतात, जर तुमच्या घरच्या शॉवरमध्ये अशी सोय असेल तर तुम्ही पद्धतशीर शॉवर हेड वेगळं काढून घासून स्वच्छ करू शकता.
जर तुम्हाला, शॉवर हेड काढता येणार नसेल तर आपण एका प्लास्टिकच्या पिशवीत पाणी व व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिसळून शॉवरला बांधून ठेवू शकता, रबर बँड किंवा चिकटपट्टीने शॉवर हेडच्या वरील बाजूला ही पिशवी लावून ठेवू शकता पण शॉवर पूर्णपणे व्हिनेगरच्या पाण्यात भिजलेला असेल याची खात्री करा. जेव्हा तुम्ही ही पिशवी काढाल तेव्हा काही सेकंद तरी पाणी असेच वाहू द्या जेणेकरून व्हिनेगर पूर्णपणे निघून जाईल. आपण एका स्प्रे बॉटलमध्ये ५०- ५० टक्के अशा प्रमाणात पाणी व व्हिनेगर मिसळून भरूनच ठेवावे जेणेकरून दर आठवड्याला तुम्ही हे पाणी स्प्रे करून शॉवर स्वच्छ करू शकता.