विधानसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने कामाला लागले आहेत. एकाच मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार असल्याने उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची याबाबत वरिष्ठांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते असून भाजपमधूनच अनेक जण इच्छुक असल्यामुळे आता बबनराव पाचपुते यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार का? की ठिकाणी खांदेपालट होणार याकडे श्रीगोंदाकरांचे लक्ष लागून आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या पाठोपात आता भाजपमधूनच सुवर्णा पाचपुते यांनी निवडणुकीची तयारी केली असून निवडणुकीसाठी गेल्या वर्षभर त्या श्रीगोंदा मतदारसंघात जनसंपर्क करत आहेत. मागील वेळी सर्व तयारी झाली होती मात्र ऐन वेळेस पक्षातील वरिष्ठांनी थांबण्यास सांगितल्यामुळे आपण थांबलो होतो. मात्र यावेळेस सर्वच वरिष्ठ नेते आपल्याबरोबर असून भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी गळ घालत आहेत. जनतेच्या मनातील आमदार असल्यामुळे यावेळेस भाजपकडून श्रीगोंदा मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा सुवर्णा पाचपुते यांनी व्यक्त केली आहे.