Tuesday, June 25, 2024

प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेला उच्चशिक्षित तरुण बुडाला

श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील तरुण मालुंजा माहेगाव पांथा येथील बंधार्‍यात बुडाल्याची घटना आज दुपारी घडली. तरूणाला शोधण्याचे काम सुरू आहे. मालुंजा बुद्रुक येथील किरण चांगदेव तोगे (वय 22) असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. आज (शनिवार) दुपारी त्याच्या दोन मित्रांसमवेत पोहण्यासाठी जातो असे, म्हणून परिसरातील मालुंजा माहेगाव पांथा येथील बंधार्‍यात पोहण्यासाठी सदर तरुण गेले होते.

त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. पोहत पोहत दुसर्‍या बाजूला गेले, परंतु माघारी येतांना किरण यास दम लागल्याने तो पाण्यात बुडाला असल्याचे तरुणांनी सांगितले. सदर तरुणांनी त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ गेले. त्याच्याबरोबर असलेल्या तरुणांनी सदर घटनेची माहिती गावात सांगितली. माहिती समजतात ग्रामस्थांसह सरपंच अच्युतराव बडाख हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लाडगावचे पोलीस पाटील भांड यांना सदर घटनेबाबत माहिती दिली. त्यांनीही घटनास्थळी दाखल होऊन श्रीरामपूर पोलीस ठाण्यास सदर माहिती दिली.

तसेच महसूल प्रशासनासही कळविले. तात्काळ श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक तसेच नायब तहसीलदार वाकचौरे घटनास्थळी दाखल झाले. जमलेल्या सर्वांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. किरणचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. किरण हा एकुलता एक होता. एक महिना पुर्वी तो श्रीरामपूर येथेच टाटा फायनान्समध्ये नोकरीस लागला होता. त्याने एम बी ए शिक्षण पूर्ण केले होते. कालच त्याचा पहिला पगार झाला होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles