खा. सदाशिव लोखंडे यांनी तीनवेळा आमदारकीची हॅट्रिक केली. लोखंडे यांच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. याचबरोबर गेली पंचवीस वर्ष रखडून असलेला निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये सदाशिवराव लोखंडे यांची महत्त्वाची भूमिका होती. येत्या काळात लोकसभा निवडणुका असून खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोखंडे यांची हमी घेतल्याने ते आता खासदारकीमध्ये देखील हॅट्रिक करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा, तसेच मुख्यमंत्री वयोश्री व नारीशक्ती योजनांचे लोकार्पण श्रीरामपूर येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, ह.भ.प. रामगिरीजी महाराज, खा. श्रीकांत शिंदे, खा. डॉ. सुजय विखे, आ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आदी उपस्थित होते.
दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वत: आपले काम करत राहिल्याचा फायदा लोखंडे यांना झाला आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली या मतदार संघात 300 ते 400 कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे देखील यावेळी डॉ .शिंदे म्हणाले.