राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थित पार पडला. या मेळाव्यास मेळाव्रास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अॅड. संदीप वर्पे आदी पक्षाचे प्रमुख उपस्थित होते. या मेळाव्यापूर्वी फाळके व अॅड. वर्पे यांनी माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या ‘जिद्द’ निवासस्थानी जावून तर आ. प्राजक्त तनपुरे यांनी दूरध्वनीवरून मुरकुटे यांच्याशी चर्चा करुन ज्येष्ठनेते शरद पवार यांचा पक्षासोबत आपण काम करावे, असा निरोप असल्याचे सांगितले. यावेळी मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय कळवितो असे सांगितले. मात्र या चर्चेनंतर काही वेळात झालेल्या मेळाव्यास माजी आ. मुरकुटे यांची कट्टर समर्थक भाऊसाहेब मुळे, गणेश भाकरे, गणेश छल्लारे, प्रसाद खरात, आशिष दौंड, बाळासाहेब नाईक आदी उपस्थित होते. मुरकुटे समर्थकांची उपस्थिती मुरकुटे यांच्या संमतीनेच असावी, असे मानले जात आहे.
येत्या 3 व 4 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीत कार्यकर्त्यांच्या मेळावा होत आहे. यावेळी मुरकुटे यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.