अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या देवदैठण येथील पती-पत्नीने एमपीएससी परीक्षेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. राहुल रामदास कौठाळे व त्यांच्या धर्म पत्नी मेघा कौठाळे यांनी एमपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. या दांपत्याने एकाच वेळी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.यामुळे सध्या या दांपत्याची संपूर्ण जिल्हाभर चर्चा पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहुल आणि मेघा यांनी एकाच वेळी पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाला गवसणी घालण्याचा भीम पराक्रम केला आहे. यामध्ये राहुल यांनी 17 वी रँक मिळवली आहे तर मेघा यांनी 43 वी रँक मिळवली आहे.
या दांपत्याने एकाच वेळी एकाच पदावर यश संपादित केले आहे. विशेष म्हणजे हे दाम्पत्य अशी कामगिरी करणारे श्रीगोंदा तालुक्यातील पहिले दांपत्य ठरणार आहे. यामुळे या यशाची सध्या मोठी चर्चा रंगलेली आहे. राहुल यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.माध्यमिक शिक्षण त्यांनी त्यांच्या गावातच पूर्ण केले. कठीण परिस्थितीमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण शिरूर येथून पूर्ण केले. यानंतर मुंबई येथून बीव्हीएससीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. पुढे त्यांनी एम व्ही एस सी औषध निर्माण शास्त्रातील शिक्षण पूर्ण केले.
विशेष बाब म्हणजे उच्च शिक्षण सुरू असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या करिअरच्या अतिशय महत्त्वाच्या फेजमध्ये त्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. यामुळे ते काही काळ मानसिक तणावात होते. मात्र काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते.त्यांना अधिकारी बनायचे होते आणि यासाठी त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी काही काळ कंत्राटी शिक्षक म्हणून मुंबईत काम देखील केले. विशेष म्हणजे त्यांच्या आईने आणि चुलतीने देखील गावाकडे त्यांच्या शिक्षणासाठी मोठी मेहनत घेतली.
अखेरकार या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांची पशुसंवर्धन अधिकारी म्हणून निवड झाली. मात्र त्यांना आणखी मोठ पद हवं होतं यामुळे त्यांनी नोकरी सोबतच अभ्यास देखील सुरूच ठेवला. दिंडोरी येथे पशुसंवर्धन अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी आता एमपीएससीच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्त पदाला गवसणी घातली आहे.राहुल यांचा विवाह 2018 मध्ये मेघा यांच्याशी झाला. मेघा यादेखील नासिक येथे पशुसंवर्धन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान मेघा यांनी देखील एमपीएससीच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्त पदाला गवसणी घातली आहे.
निश्चितच या दांपत्याने मिळवलेले हे यश इतर नवयुवक तरुण तरुणींसाठी देखील खूपच प्रेरणादायी ठरणार आहे. मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते हेच या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.