नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला ज्या जागा येतील, त्यातील १० टक्के या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी असतील, अशी ग्वाही पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उमेदवारी देताना नव्या-जुन्या चेहऱ्यांचा मेळ साधण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजनानिमित्त जाहीर सभा झाली. यावेळी पवार यांनी, लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलण्यात येईल असा प्रचार केला होता, याकडे लक्ष वेधले. संविधान कोणीही बदलू शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आम्ही तेच सांगत होतो. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात असे होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. उद्याोग, विमानतळ, रस्ते यांसह अन्य विकासकामांसाठी पैसा लागतो. काही कामांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळतो तर, काही निधी राज्य सरकार देते. परंतु, निधी वेळेवर मिळाल्यास महत्त्व असते. काही वेळा व्याजाने पैसे आणावे लागतात, असे पवार यांनी म्हणाले.
माझा परिवार बारामतीमध्ये आहे. सर्व काही झाले की, माझ्या घरट्यात जावून थांबतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अध्यक्ष अजित पवार यांनी सभेत सांगितले. यावेळी स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांनी, पवार यांना सिन्नरमधून निवडणूक लढविण्याचे आवाहन केल्यावर पवार यांनी शेवटी बारामती माझी आणि मी बारामतीचा असल्याचे सांगितले.