मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट समाजातील विविध नेते घेत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू राजरत्न आंबेडकर यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर हिंगोलीत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. ते यावेळी म्हणाले की मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी प्राण पणास लावले आहे. मराठा आरक्षणाकरिता लढा उभा केला आहे, त्याला पूर्ण पाठिंबा असल्याने मराठा समाजाने आम्हाला आमंत्रित केल आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या पक्षांपासून आम्ही दूर आहोत. मनोज जरांगे यांचा पक्ष नसल्याने आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत असेही राजरत्न आंबेडकर यांनी म्हटले आहे.
राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की आम्ही राजकीय पक्षांपासून दूर आहोत. आमचा खरा प्रतिनिधी आज उरलेला नाही. अनुसूचित जातीच्या 29 जागा आरक्षित असताना त्यापैकी 15 जागा तर बीजेपीने चोरलेल्या आहेत. जो पक्ष घटना संविधान हटविणार असे सांगत असतो तोच पंकजा मुंडे यांना आरक्षित जागेवर उभे करुन निवडून आणतो.बीजेपी संविधान संपविण्याची भाषा करते त्यांना आरक्षित जागेवर उमेदवार उभा करण्याचा नैतिक अधिकार आहे का ? असा सवालही राजरत्न आंबेडकर यांनी केला आहे. मराठा, मुस्लिम ,बौद्ध ,लिंगायत, मातंग, माळी या समाजाला एकत्र आणायला हवे, महाविकास आघाडी आणि महायुती हे पक्षीय राजकारण आहे, ते थांबलं पाहिजे आणि खरे प्रतिनिधी आपण सभागृहात पाठवले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.