शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे कधीकाळी एकत्र असणाऱ्या पक्षातील उमेदवारच आता यंदाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहणार आहेत. अशातच सध्या अजित पवार स्वगृही परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर बोलताना तुफान टोलेबाजी केली आहे.काही दिवसांपूर्वी भाजपच्या अजगराचा विळखा देशाला आणि राज्याला पडला होता. कोणीही उघड बाहेर पडायला तयार नव्हतं. जंगलाला आग लागल्यावर आपला बिबट्याही 40 जणांना घेऊन पळून गेला होता. मात्र यावेळी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चिमणी बनून आपल्या चोचित थेंब थेंब पाणी टाकून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि मतदारांनी मतांचा पाऊस पडल्यानं ही आग विझली. आता हाच बिबट्या पुन्हा शिकारीला बाहेर पडायच्या तयारीत आहे. इकडे येऊन याच चिमण्यांची शिकार करणार असल्यानं त्याला येऊ देऊ नका, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय सेलच्या कार्यक्रमात जानकर यांनी अजित पवार यांच्या प्रवेशाला विरोध करताना जोरदार टोलेबाजी केली.