सरकारी योजनेंतर्गत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आली आहे. सॉवरेन गोल्ड बॉण्डची नवी सीरिज 18 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. ज्यामध्ये तुम्ही 22 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत, यावेळी तुम्हाला एक ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 6,199 रुपये खर्च करावे लागतील. ही किंमत बाजारातील सोन्याच्या किमतींपेक्षा कमी आहे, जी IBJA च्या प्रकाशित दराच्या आधारे ठरवली जाते. तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉण्डसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकता.
सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेअंतर्गत 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते. यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर 2.50 टक्के वार्षिक निश्चित व्याज दिलं जातं. जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही यावर कर्ज देखील घेऊ शकता. ही योजना आरबीआयद्वारे चालवली जाते. जर एखाद्या व्यक्तीनं ऑनलाईन गुंतवणूक केली आणि सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेत डिजिटल पेमेंट केलं, तर त्याला 50 रुपयांची सूट दिली जाते. म्हणजेच, 1 ग्रॅम सोन्यासाठी 6,149 रुपये मोजावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्हाला 10 ग्रॅम सोन्यासाठी 500 रुपयांच्या सूटसह 61,490 रुपये मोजावे लागतील. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकता. त्याचा मॅच्युरिटी पीरियड 8 वर्ष आहे.