यंदा सोयाबीन पिकावर आलेल्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करत आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात होती.
मात्र आता राज्य सरकारने निर्णय घेत शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पण यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीनची सवंगणी केली आहे. यामुळे आता सवंगणी केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे कसे होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगासह येलो मोजॅक, मुळकूज, खोडकूज हे रोग आले होते. यामुळे सोयाबीन हे पिवळं पडत उत्पादनात मोठी घट होणार आहे. शेतकऱ्याने लावलेला खर्चही निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. अशातच सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देताच सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन काढलाय अशाचे कसे पंचनामे होणार हा प्रश्नच आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ३२ हजार ५३३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. यापैकी ९० हजार १६६ हेक्टरचा पीक विमाही शेतकऱ्यांनी काढला आहे. पंचनामे झाल्यावर सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातं आहे.
राज्य सरकारने सोयाबीनच्या नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने संयुक्त पंचनामे करावेत, असे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने ९ तारखेला राज्याच्या वन आणि महसूल विभागाने सोयाबीनचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
पण यात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, त्यांना कशी मदत करता येईल याबाबत स्पष्टता नाही. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, एवढंच नव्हे तर सरकारने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात दिरंगाई केली आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन सवंगणी करून ठेवलं आहे. त्यांच्या उत्पादनात झालेल्या घटीचं अवलोकन कसं होणार हा प्रश्न अनुत्तरणीय आहे. यामुळे सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी आमदार रणजित कांबळे यांनी केली आहे.