Wednesday, June 19, 2024

नगरमध्ये आयटी पार्कसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन ,लाखो तरुणांना मिळणार रोजगार !

नगरमध्ये आयटी पार्कसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन (एसईझेड) उभारणीची मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांकडे किरण काळेंची मागणी ;

प्रतिनिधी : हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माहितीतून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पुण्याच्या हिंजवडी आयटी हब मधून ३७ कंपन्या महाराष्ट्रा बाहेर गेल्या आहेत. त्यापैकी ४ जरी नगरला आल्या असत्या तरी माझ्या नगर मधील हजारों मुला, मुलींना रोजगार, व्यापारी, बाजारपेठेला चालना मिळाली असती, असे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासह नगरच्या तरुणाईच अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर प्रकारावरून राज्य शासनाने बोध घेतला पाहिजे असे म्हणत माझ्या नगरच्या तरुणांच्या रोजगारा करिता विस्तारित एमआयडीसी मंजूर करत आयटी पार्कसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन (एसईझेड) उभारणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे काळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, इन्फोसिस, टीसीएस, कॉगनीझंट, विप्रो यासह अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्या पुण्यात आहेत. एकट्या हिंजवडीत आयटी हबमध्ये सुमारे पाच लाख तरुणांना रोजगार आहे. केवळ ट्राफिक जामच्या समस्येमुळे सदर कंपन्या महाराष्ट्रा बाहेर हैदराबाद, बंगलोर, चेन्नईकडे स्थलांतरित झाल्याची माहिती समोर आली आहे. काळे यांनी सरकारच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली असून म्हटले आहे की, धक्कादायक बाब म्हणजे याबद्दल उद्योग मंत्री सामंत यांना प्रसारमाध्यमांनी विचारले याबाबत त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. काळे म्हणाले, यापूर्वी देखील वेदांता फॉक्सकॉन कंपनी गुजरात मध्ये पळूवून नेली गेली. ही कंपनी पुणे जिल्ह्यात उभारली जाणार होती. यामुळे लगतचा जिल्हा असल्याने नगरच्या तरुणांना देखील रोजगार मिळणार होता. माञ तो मिळू शकला नाही.

त्या ३७ कंपन्यांच्या स्थलांतराचा नगरच्या तरुणांवर परिणाम :
किरण काळे यांनी गंभीर दावा केला आहे. ते म्हणाले, नगर शहरातून दरवर्षी हजारो तरुण, तरुणी अभियांत्रिकी शिक्षणासाठी पुण्याकडे स्थलांतरित होतात. शिक्षणा नंतर त्यांना हिंजवडी आयटी पार्क मध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी असते. मात्र ३७ कंपन्यांच्या स्थलांतरामुळे नगर मधील अनेक मुलांना देखील याचा फटका बसला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

किरण काळे म्हणाले, नगरच्या असणाऱ्या मात्र अभियांत्रिकीचे पुणे, मुंबईसह अन्य शहरांमध्ये शिक्षण, रोजगाराच्या निमित्ताने कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या तरुणांची मागील १५ ते २० वर्षांतील संख्या आज जवळपास एक लाखांवर आहे. मात्र त्यांना पूरक अशा रोजगाराची उपलब्धता नगर एमआयडीसीत नाही. नगरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, फार्मासिटिकल, ऑटोमोबाईल या सारख्या वेगवेगळ्या सेगमेंट मधील कंपन्या आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मात्र विशेषत: आयटी क्षेत्रामध्ये पदव्या असणाऱ्या मुला, मुलींची शहरातील संख्या मोठी असल्याने आणि नोकरीसाठी ते पुणे, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई तसेच परदेशात असणाऱ्या आयटी कंपन्यांवर अवलंबून असल्यामुळे त्यांना नगर शहरा लगतच एसईझेडची उभारणी करून माझ्या तरुणाईला इथेच रोजगार द्यावा. जेणेकरून त्यांच्यावर स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवणार नाही. त्यांना शहरातच आपल्या कुटुंबासमवेत राहत रोजगाराची संधी मिळेल. यामुळे नगर वयोवृद्ध आणि पेन्शनर्स लोकांचे शहर होण्यापासून आपण वाचवू शकू.

काय आहे एसईझेड ? :
एसईझेड बाबत माहिती देताना किरण काळे म्हणाले की, सध्याच्या एमआयडीसी मध्ये मोठ्या कंपन्यांना लागणाऱ्या क्षेत्राची उपलब्धता नाही. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर केवळ धूळफेक करत एमआयडीसीची घोषणा केली गेली. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी तर आयटी पार्क उभा केला गेल्याचे भासविले गेले. यातील सत्यता यापूर्वीच मी नगरकरांसमोर आणली आहे. तरुणाईच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून राजकारण नको या विचारांचा मी आहे. त्यामुळे नगर शहरातच रोजगार मिळवून देण्यासाठी खऱ्याखुऱ्या आयटी पार्कच्या उभारणी कामाची जबाबदारी आपल्यावर आहे. त्याकरिता नगर शहरा लगत पडीक जिरायती क्षेत्र निश्चित करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देत नव्याने जमिनीचे अधिग्रहण सरकारने एसईझेड जाहीर करत करावे. हा एसईझेड केवळ आयटी पार्कसाठी असावा. आयटी पार्क साठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांचा अंतर्भाव यामध्ये केला जावा. एसईझेडची उभारणी झाल्यास त्यामध्ये वेगवेगळे झोन तयार केले जाऊ शकतील. जसे की, इंडस्ट्रियल पार्क, इकॉनॉमिक आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झोन, हायटेक झोन, सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क, याला लागूनच एअरपोर्ट, लक्झुरियस हॉटेल्स, मॉल्स, एंटरटेनमेंट झोन, उत्तम अंतर्गत रस्ते, २४ तास पाणी व विजेचा पुरवठा, कंपन्यांना टॅक्स मध्ये मोठी सूट, इंटरनेट सुविधे करिता फायबर ऑप्टिकल केबलचे परिपूर्ण नेटवर्क या बाबी एसईझेडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने आम्हाला मदत करावी असे काळे यांनी म्हटले आहे.

किमान ५० वर्षांचे व्हिजन हवे :
किरण काळे म्हणाले की, शहरातल्या तरुणाईच्या रोजगाराचा आणि बाजारपेठेला चालना देण्याच्या दृष्टीने पुढील ५० वर्षांचे व्हिजन ठेवून नियोजन करण्याची गरज आहे. केवळ व्हिजन नसणारे राजकीय नेतृत्व, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे शहराचा विकास रखडला आहे. दुर्दैवाने पुण्यातून बाहेर गेलेल्याचा कंपन्यांना बाहेर जाण्या पासून रोखत महाराष्ट्रातच अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या नगरकडे वळविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. मात्र सत्ताधारी असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. माझे स्वप्न आहे की माझ्या नगर शहराला आधी नाशिक, औरंगाबादच्या बरोबरीत आणायचे. त्यानंतर मुंबई – पुणे – नगर आशा इंडस्ट्रियल कॉरिडोरची उभारणी करायची. नगर – पुणे इंटरसिटी रेल्वे मार्ग कार्यान्वयीत करायचा. त्यामुळे माझ्या मागणीचा मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करून याबाबत सकारात्मक पाऊले उचलावीत अशी माझी त्यांच्याकडे मागणी असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

व्यापारी, बाजारपेठेला चालना मिळेल :
सद्यस्थितीत शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ तसेच उपनगरांतील व्यापारी व्यवसायात असणाऱ्या मंदीमुळे हवालदिल आहेत. शहरात सरकारी व खाजगी नोकरदार, स्वयंरोजगारातून उत्पन्न कमावणारे, एमआयडीसी क्षेत्रात काम करणारे घटक हे बाजारपेठेसाठीचे ग्राहक आहेत. मात्र मागील अनेक दशकांपासून शहर विकासात कोणतीही भर पडलेली नसल्यामुळे ग्राहकांची बाजारपेठेत जाऊन खर्च करण्याची क्रयशक्ती मर्यादित आहे. जोपर्यंत एमआयडीसी वाढणार नाही, रोजगार निर्मिती होऊन ग्राहकांच्या खिशामध्ये पैसे येणार नाहीत तोपर्यंत ते बाजारात खर्च करू शकणार नाहीत. त्याशिवाय व्यापार आणि बाजारपेठेला चालना मिळणे केवळ अशक्य आहे. शहरातील माझे व्यापारी हे व्यावसायिक दृष्ट्या टिकायचे असतील आणि वृद्धिंगित व्हायचे असतील तर पुढील पन्नास वर्षांचे व्हीजन ठेवून शहर विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे. यासाठी मी व्यक्तिशः आग्रही असून त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न सरकार दरबारी करणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

रियल इस्टेट सेक्टरला बूम मिळेल :
आयटी पार्क एसईझेड उभारणीमुळे हजारो घरांची राहण्यासाठी गरज निर्माण होईल. त्यामुळे आर्किटेक्ट, बिल्डर्स, रियल इस्टेट मधील गुंतवणूकदार यांच्यासाठी घरे उपलब्ध करून देण्याची संधी मिळेल. यामुळे रियल इस्टेट सेक्टर, पतपुरवठा करणाऱ्या बँकिंग संस्था, चार्टर्ड अकाउंटंट यांना बूम मिळू शकेल. यातून शेवटी नगर शहरातील स्थानिक अर्थचक्राला मोठी चालना मिळेल असा दावा किरण काळे यांनी केला आहे.

राज्य सरकारला पाठवलेल्या निवेदनाच्या सुरुवातीलाच किरण काळे यांनी सदर निवेदन हे मी नगर शहरातील माझ्या तमाम तरुण-तरुणी, त्यांचे पालक, व्यापारी, शहरातील विविध सेवांचा पुरवठा आपल्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून करणारे कष्टकरी, उद्योजक, वकील, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सीए, शिक्षक, प्राध्यापक, खासगी – सरकारी नोकरदार, महिला भगिनी, अपंग – दिव्यांग बांधव, प्रत्येक सर्वसामान्य नगरकर आदी सर्व घटकांच्या प्रतिनिधींच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी या नात्याने आपणास पाठवीत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे हे केवळ माझे वैयक्तिक म्हणणे असून या शहराच्या विकासाच्या दृष्टीने तमाम सर्व नगरकरांच्या वतीने काळे यांनी आपली ही मागणी असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles