लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर १० जून रोजी ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. उज्ज्वल निकम यांच्या पुनर्नियुक्तीला काँग्रेसने विरोध केला होता. अशामध्ये आता ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला एका आरोपीने आव्हान दिले आहे. त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी आरोपीने मुंबई हायकोर्टाकडे केली आहे. उज्ज्वल निकम यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
अनेक हत्या प्रकरणांत आरोपी असलेला विजय पालांडेने सोमवारी ॲड. उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला कोर्टामध्ये आव्हान दिले आहे. विजय पालांडेने केलेल्या याचिकेमध्ये उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली आहे, असे म्हटले आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार, अजेंडा बदलेला आहे. ते आता भाजपचे नेते आहेत, असे पालांडेने याचिकेत म्हटले आहे.
निकम यांनी उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा १६,००० हून अधिक मतांनी पराभव केला. ॲड. निकम यांची पालांडेच्या खटल्यात पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप सरकारने निकम यांची नियुक्ती कुहेतूने केली असून त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा प्रचार निकम करतील. आता लोकांच्या नजरेत निकम यांचा हेतू, अजेंडा पूर्णपणे बदलला आहे. ते आता राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील. भाजपची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी ते हाय-प्रोफाइल प्रकरणांतील कथित आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून कोणत्याही थराला जातील आणि ते आरोपीच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल., असे पालांडेने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.