राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे. रोहित पवार यांच्या दाव्यावर भाष्य करताना मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघावर मोठं वक्तव्य केलं आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांनी रोहित पवार यांच्या दाव्यावर भाष्य करताना म्हणाले की, ‘रोहित पवार यांना राजकीय वारसा आहे. त्यांच्या घरात चर्चा सुरू असतील त्यातून त्यांना ही टीप मिळाली असेल.माझं त्यांच्या एका वाक्याला समर्थन आहे. कल्याण लोकसभा भाजपला जाण्याची शक्यता आहे या मतदारसंघात सध्या वाटचाल देखील त्याच दिशेने सुरू आहे.
‘भाजपचे मोठे नेते अनुराग ठाकूर या लोकसभा मतदारसंघात बैठका घेतात. त्यामुळे या ठिकाणची उमेदवारी कोणता पक्ष घेईल याबाबत संभ्रम आहे असे सांगितले. तसेच पक्षाने आदेश दिल्यास ही लोकसभा मतदारसंघात मनसे लढवेल आणि स्वबळावर ही निवडणूक लढवेल असे देखील सांगितले.
दरम्यान, कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेना शिंदे गटासह भाजपला लक्ष केले.
‘प्रशासन गेंड्याच्या कातडीचं झालं आहे. वन विंडो स्कीम सुरू आहे. या ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत. अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यात सत्ताधारी देखील सहभागी असतात. त्यामुळे त्यांना कोणी भीक घालत नाही. त्यामुळे जसे गणपती खड्ड्यातून गेले, तसेच येत्या निवडणुकीत यांनाही खड्ड्यात टाका तरच आपलं भलं होईल, अशी सडेतोड टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह महापालिका प्रशासनावर केली.
या दरम्यान, माझ्या वाढदिवसाच्या बॅनर लावू नका एका बॅनर ऐवजी निदान एक खड्डा भरा, असं आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केलं . त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.