शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचं जाहीर केलंय. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सरकारने मागच्या वर्षीच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये एक हजार रुपयांची वाढ केलीय. सरकार एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ६ हजार रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांचा बोनस दिला गेला होता.
दरम्यान एसटी संघटनांनी यंदा दिवाळीचा बोनस सरसकट १५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. मात्र शिंदे सरकारकडून ही मागणी मान्य झालेली नाही. परंतु बोनसमध्ये वाढ झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांची दिवाळी काही प्रमाणात गोड होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि एसटी महामंडळाचे एमडी शेखर चन्ने आणि सेवा शक्ती संघटनेचे शिष्टमंडळ यांच्यात बैठक झाली. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली होती.
गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्त्वाखाली सातवा वेतन आयोग आणि विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा एल्गार उगारण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज ही बैठक पार पडली. यात दिवाळी बोनससह सातवा आयोग किंवा विलनीकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत ३० नोव्हेंबरच्या आत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.