मुंबई: राज्यातील दुष्काळी भागात तातडीने चारा, पाणी व अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून जनतेला दिलासा देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या ४० तालुक्यांत चारा डेपो सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील मराठवाडा विभाग दुष्काळाच्या छायेत असून या विभागातील जलाशयांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा उरला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सरकारचे दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असून सरकारने तातडीने उपयायोजना करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यात सध्या राज्यात २५ जिल्ह्यांतील ११,५९५ गाव-वाड्यांमध्ये ३,९६६ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक १९७७ टँकर मराठवाड्यात सुरू आहेत. राज्यात आजमितीस ५१२.५८ लाख मेट्रीक टन हिरवा चारा उपलब्ध असून तो ३१ जुलै पर्यंत पुरेल. तसेच १४४.४५ लाख टन वाळलेला चारा उपलब्ध असून तो ३० जून पर्यंत पुरेल. मात्र दुष्काळी भागात चारा टंचाई असून चारा छावण्या सुरू कऱण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ३१आक्टोबर २०२३ रोजी ज्या ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तेथे पाच ते सहा गावांसाठी एक याप्रमाणात चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्रिमंडळाला देण्यात आली.