राज्याच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती झाल्याबद्दल लोणीचे भूमीपुत्र आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी या नात्याने लोणी ग्रामस्थांनी डॉ.नितीन करीर यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीत डॉ.करीर यांना मानपत्र, प्रभू श्रीरामचंद्रांची मुर्ती आणि पारंपारिक फेटा बांधून ग्रामस्थांनी सन्मानित केले. डॉ.करीर यांच्या उपस्थितीत लोणी खुर्द येथील व्यापारी संकुलाचे उद्घाटन तसेच लोणी बुद्रूक येथील विकसीत करण्यात येणा-या ग्रामसचिवालयाचे भूमीपुजन संपन्न झाले.
माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, जेष्ठ नेते भाऊसाहेब विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, कैलास तांबे, डॉ.भास्करराव खर्डे, नंदू राठी, शिवाजीराव जोंधळे यांच्यासह करीर कुटूंबिय आणि मान्यवर पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ.नितीन करीर यांनी प्रवरा पब्लिक स्कुल मधील तसेच लोणी येथील वास्तव्यातील आठवणींना उजाळा देताना येथील शाळेने आम्हाला संस्कारा बरोबरच या परिसराने जगाच्या माहीतीचे आकलन आम्हाला करुन दिले. आज ज्या बालवाडीत मी गेलो त्या जागेवर आत मोठी इमारत उभी आहे. पण त्या बालवाडीची जागा कायम ठेवल्याचा आनंद मला झाला. यावरुन विकासाची किंमत मोजावी लागते हे या मातीने दाखवून दिले असा गौरवपुर्ण उल्लेख करुन डॉ.नितीन करीर म्हणाले की, समानतेचा विवेक या मातीने आम्हा सर्वांना दिला. हा विवेक पुढे घेवून जाण्यासाठी पुढच्या पिढीने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सुचित केले.