यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपासह सत्ताधारी पक्षांकडून पैशांचं अमाप वाटप होतं आहे. नेते, गुंड आणि मतं विकत घेण्यासाठी आत्तापर्यंत राज्य सरकारन दोन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. तर मागच्या अडीच वर्षांत या सरकारने २५ हजार कोटींचे घोटाळे केले आहेत असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही या सगळ्या प्रकरणांची चौकशी करु असंही रोहित पवार म्हणाले आहेत. रोहित पवारांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.
सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटपसाठी टँकर, रुग्णवाहिका, झेड सिक्युरिटीतल्या गाड्या, हेलिकॉप्टर या सगळ्यांचा वापर केला असाही आरोप रोहित पवारांनी केला आहे. आता निवडणुकीत शेतकरी आणि मराठी माणूस सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार आहे असंही वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. तसंच महायुतीला जास्त जागा मिळणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. एकट्या बारामतीत १५० कोटी रुपये मतदानाच्या पू्वी खर्च करण्यात आले असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.