मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. याचा थेट फटका राज्यभरातील एसटी प्रवाशांना बसला. गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या, ग्रामीण भागांत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे यामुळे प्रचंड हाल झाले. राज्यातील २५१ आगारांपैकी ५९ आगारे पूर्णत: बंद झाल्याने एसटीची सेवा विस्कळीत झाली.
‘ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ अशी ओळख असलेल्या एसटीची धाव कर्मचारी आंदोलनामुळे मंगळवारी प्रचंड मंदावली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात आगारातून बस सुटत नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. अनेक भागांत वाडी-वस्त्यांना मुख्य शहराशी जोडणारी एसटीची सेवा ठप्प होती. सामान घेऊन गावी निघालेल्या कुटुंबांनाही खूप हाल सोसावे लागले. काही बस आगारांत कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले. गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.