Thursday, July 25, 2024

दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान ,नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 82 कोटी रुपयांचे अनुदान

अहमदनगर -राज्य शासनाने गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केल्यानंतर 11 जानेवारी ते 10 मार्च या पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 82 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. योजनेपासून वंचित राहिलेल्या उत्पादकांना 15 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील. तसेच, नव्याने जाहीर झालेल्या अनुदानास साधारणतः एवढेच दूध उत्पादक पात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुग्ध विकास विभागाला नवीन शासकीय निर्णयाची प्रतीक्षा लागली असून, त्यानंतर अंमलबजावणी होईल. दूध व दुग्धजन्य पदार्थाची मागणी कमी झाल्याने दुधाचे दर घसरले आहेत. सद्यस्थितीतील गायीचे दूध 20 ते 30 रुपये प्रतिलिटर या दराने विक्री होते.

राज्याचे महसूल तथा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा दर गृहित धरून दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची विधिमंडळात घोषणा केली. यापूर्वीही दूध उत्पादकांना अनुदान दिले आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 67 कोटी 19 लाख 81 हजार 555 रूपयांचे अनुदान दिले. जिल्ह्याबाहेरील काही शेतकरी जिल्ह्यातील दूध शीतकरण केंद्रांवर दूध घालतात. अशा शेतकर्‍यांना 15 कोटी 59 लाख 17 हजार 85 रूपयांचे अनुदान दिले आहे. जिल्ह्यात यापूर्वी 74 प्रकल्पांनी युझर आय.डी. आणि पासवर्ड दिले होते. ज्या दूध संकलन केंद्र किंवा शीतकरण प्रकल्पावर दहा हजारांपेक्षा जास्त दुधाचे संकलन होते.

त्यांनी जिल्हा दुग्ध व्यावसाय विकास अधिकारी कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, नगर येथे संपर्क साधावा. अन्न- औषधे प्रशासन विभागाचा परवाना, उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र आणि दूध तपासणी करणारे ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन डॉ. गिरिष सोनाने, जिल्हा दुग्ध व्यावसाय विकास अधिकारी, नगर यांनी केले आहे.

शेतकर्‍यांना दुधाचे अनुदान मिळण्यासाठी जनावरांची भारत पशुधनवर नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी जनावरांचे इअर टॅगिंग करणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांच्या जनावरांचे इअर टॅगिंग राहिले आहे, त्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्रात संपर्क करावा.
– डॉ.सुनील तुंबारे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles